काश्मीरमधील सौंदर्यस्थळांमध्ये गणल्या जाणाऱ्या पहलगाममध्ये नुकताच एक भीषण दहशतवादी हल्ला घडला. या घटनेत 26 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला आणि 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले. या भयावह घटनेत आसाममधील प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य आणि त्यांचे कुटुंबीय चमत्कारिकरित्या वाचले. त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि प्रसंगावधानामुळे त्यांचे प्राण वाचले, आणि त्यांनी या हल्ल्याचा अनुभव सांगताना अनेकांची मने हेलावून टाकली.

प्राध्यापक भट्टाचार्य हे आसाम विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर आहेत. ते आपल्या पत्नी आणि मुलासह सुट्टीसाठी पहलगामला गेले होते. जेव्हा ते बैसनर खोऱ्यातील एका झाडाखाली विश्रांती घेत होते, तेव्हाच अचानक गोळीबार सुरू झाला. सगळीकडे अफवांचे आणि भीतीचे वातावरण पसरले. काही वेळातच दहशतवाद्यांनी तिथे धडक दिली आणि पर्यटकांना त्यांच्या धर्मावरून लक्ष्य करायला सुरुवात केली.
भट्टाचार्य यांनी सांगितले की, “झाडाखाली बसलेलो असताना काही लोक ‘कलमा’ म्हणत असल्याचे माझ्या लक्षात आले. मीही लगेच त्यांच्याजवळ जाऊन बसलो. एक दहशतवादी माझ्याजवळ आला आणि मला विचारलं, ‘तू काय करतोयस?’ मी घाबरून जोरात कलमा म्हणायला सुरुवात केली – ‘ला इलाहा इलाल्लाह’… तो काही वेळ तिथे उभा राहिला, पण काही न बोलता तिथून निघून गेला.”
या प्रसंगानंतर भट्टाचार्य यांनी आपल्या पत्नी आणि मुलाला घेऊन तातडीने सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. जवळपास दोन तास पायी चालल्यानंतर त्यांना एक स्थानिक व्यक्ती भेटला, ज्याच्या मदतीने ते पुन्हा पहलगाम शहरात परतले. सुदैवाने ते तिघेही सुखरूप होते.
या घटनेनंतर आसाम सरकारने तत्काळ पावले उचलली आणि भट्टाचार्य कुटुंबीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने विशेष व्यवस्था केली. आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने यासंदर्भात अधिकृत माहिती दिली की कुटुंबीयांना प्राधान्याने घरी परत आणण्यात येत आहे आणि 26 एप्रिल रोजी त्यांचे श्रीनगरहून प्रयाण होणार आहे.
दहशतवाद्यांनी धर्माच्या आधारावर हल्ले केल्याचा संशय असून, अनेक प्रत्यक्षदर्शींनी याची पुष्टी केली आहे. या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली असून, अशा हिंसाचाराच्या घटकांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
प्राध्यापक भट्टाचार्य यांचा हा अनुभव केवळ थरारकच नाही, तर सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर एक खोल विचार करायला लावणारा आहे. एका क्षणी उच्च शिक्षित, धर्मनिरपेक्ष विचारसरणी असलेला व्यक्ती केवळ प्राण वाचवण्यासाठी वेगळ्या धर्माची प्रार्थना करतो – हे दृश्य अत्यंत व्यथित करणारे आहे. या घटनेनंतर ‘मानवता’ हाच खरा धर्म आहे, याचा पुनःप्रत्यय येतो.