महाराष्ट्रात औरंगजेबच्या कबरीवरून राजकीय वातावरण तापले आहे. काही लोकांनी औरंगजेबची कबर काढण्याची मागणी केली असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी यावर ठाम भूमिका मांडली आहे. गुढीपाडवा मेळाव्यात त्यांनी कबरीची सजावट काढून साधी कबर ठेवण्याची आणि तिथे एक फलक लावण्याची मागणी केली. फलकावर, “आम्हा मराठ्यांना संपवण्यासाठी आलेला औरंगजेब इथे गाडला गेला…” असा मजकूर असावा, असे त्यांचे मत आहे.

या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) देखील पुढे आले असून, त्यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. RSS चे वरिष्ठ नेते सुरेश भैय्याजी जोशी यांनी सांगितले की, औरंगजेबाची कबर काढण्याचा विषय अनावश्यक आहे. ते म्हणाले, “औरंगजेब इथेच मरण पावला आणि त्याची कबर बांधली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाची कबर बांधून भारताच्या औदार्याचा आदर्श घालून दिला होता. त्यामुळे औरंगजेबाची कबर राहू द्या. ज्यांना ती पाहायची इच्छा असेल, त्यांनी ती पाहावी.”
नरेंद्र मोदींच्या उत्तराधिकाऱ्याबाबतही चर्चा
दरम्यान, भैय्याजी जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य उत्तराधिकाऱ्यांविषयी देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “संघाच्या परंपरेनुसार योग्य वेळी उत्तराधिकारी निवडला जाईल.” काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी दावा केला होता की, पंतप्रधान मोदी नागपुरात जाऊन संघ प्रमुख मोहन भागवत यांना निवृत्तीचा संदेश देणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र, भैय्याजी जोशी यांनी अशा कोणत्याही चर्चेचे खंडन केले आहे.
याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर भाष्य करताना सांगितले की, “2029 मध्येही नरेंद्र मोदीच पंतप्रधान असतील,” असा विश्वास व्यक्त केला आहे.
सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून सुरु असलेली ही चर्चा किती काळ टिकते आणि यावर पुढे काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.