भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला असताना, भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत देशाच्या सुरक्षेसाठी केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली आहे. 12 मे रोजी भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी संचालनालय प्रमुखांमध्ये (DGMO) महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना कसे निष्प्रभ केलं, याची माहिती देण्यात आली.

लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की भारताची ही कारवाई केवळ दहशतवाद्यांविरोधात होती. 7 मे रोजी भारताने दहशतवादी तळांवर हल्ला चढवला होता, कारण गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवाद्यांनी केवळ लष्करावरच नव्हे तर सामान्य नागरिकांवरही हल्ले सुरू ठेवले होते. 2024 मध्ये जम्मूतील शिवखोरी मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर, तर एप्रिलमध्ये पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ले झाले होते. या सततच्या घटनांनी स्पष्ट केलं की पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना थेट मदत मिळते आहे.
पाकिस्तानच्या संभाव्य प्रतिहल्ल्याचा विचार करून भारताने आधीच सुसज्ज नियोजन केले होते. भारतीय वायूदल आणि लष्कराने एक चार स्तरांची मल्टि-टिअर एअर डिफेन्स सिस्टीम उभारली होती. या व्यवस्थेमध्ये रडार प्रणाली, काउंटर-ड्रोन सिस्टीम्स, शोल्डर फायर वेपन्स आणि अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा यांचा समावेश होता.
जेव्हा पाकिस्तानने 9 आणि 10 मेच्या रात्री भारताच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या मजबूत यंत्रणेपुढे त्यांचा प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरला. भारतीय हवाई क्षेत्राच्या रक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर तंत्रज्ञान, लोकेशन-आधारित अलर्ट प्रणाली आणि एअर डिफेन्स युनिट्स तत्परतेने सज्ज होत्या. यामुळे पाकिस्तानच्या वायूदलाला कुठलाही धोका निर्माण करता आला नाही.
लेफ्टनंट जनरल घई यांनी यावेळी हेही स्पष्ट केलं की भारताची लढाई पाकिस्तानशी नसून दहशतवाद्यांविरोधात आहे. मात्र, जेव्हा पाकिस्तान या दहशतवाद्यांना पाठिंबा देतो, तेव्हा ती लढाई आपोआपच सीमारेषेच्या पलीकडे जाऊ शकते. भारतीय लष्कर नेहमीच शांततेचा मार्ग अवलंबण्यास तयार असतो, पण देशाच्या सुरक्षिततेवर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारतीय लष्कराने पुन्हा एकदा आपली सज्जता, नियोजन, आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभाव दाखवून दिला. या यशस्वी मोहिमेमुळे भारताच्या सुरक्षेसाठी नवे मापदंड निर्माण झाले आहेत.