भारत-पाकिस्तान सीमेवर मागील काही दिवसांपासून तणावाचं वातावरण होतं. पाकिस्तानी लष्कराने पुन्हा एकदा भारताच्या सीमांवर कुरापती सुरू केल्याने भारतीय सैन्य सज्ज होतं. पाकिस्तानकडून जम्मू-कश्मीरपासून ते गुजरातपर्यंत विविध भागांत घुसखोरीचे प्रयत्न सुरू होते. मात्र यावेळी भारताने नेहमीप्रमाणे संयम न दाखवता, थेट जोरदार प्रत्युत्तर दिलं – आणि त्यातूनच “ऑपरेशन सिंदूर” या कारवाईची सुरुवात झाली.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील अनेक ठिकाणांवर अचूक हल्ले करत त्यांच्या लष्करी क्षमतेला जबर धक्का दिला. यामध्ये सर्वात मोठं नुकसान रहीम यार खान एअरबेस या पाकिस्तानी हवाई तळाचं झालं. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असलेला हा एअरबेस त्याच्या दक्षिणेकडील सामरिक दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक मानला जातो.
भारतीय हवाई दलाच्या आक्रमणात या एअरबेसची एकमेव धावपट्टी पूर्णपणे निकामी झाली. इतकंच नव्हे तर हा एअरबेस पुढील आठवडाभरासाठी पूर्णतः बंद ठेवण्याची नामुष्की पाकिस्तानवर ओढवली. पाकिस्तानी नागरी हवाई प्राधिकरणाने (CAA) NOTAM (Notice to Airmen) जाहीर करत यास अधिकृत दुजोरा दिला. त्यांच्या सूचनेनुसार, 10 मे संध्याकाळी 4.30 पासून ते 18 मेपर्यंत हा एअरबेस ऑपरेशनसाठी बंद राहणार आहे.
पाकिस्तानकडून या बंदीचे अधिकृत कारण “वर्क इन प्रोग्रेस” असं सांगण्यात आलं असलं, तरी प्रत्यक्षात भारताच्या प्रखर हल्ल्यामुळेच त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. हवाई दलाच्या मिसाईल स्ट्राइकमुळे धावपट्टीवर मोठं नुकसान झाल्याने दुरुस्ती अनिवार्य ठरली आहे. भारताच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानी हवाई दलाच्या उड्डाण क्षमतेवर मोठा परिणाम झाला आहे.
“ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत भारताने केवळ रहीम यार खानच नव्हे, तर पाकिस्तानातील इतरही काही महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर लक्ष केंद्रीत करत अचूक हल्ले केले आहेत. या कारवाईत वापरलेले क्षेपणास्त्र अत्यंत उच्च दर्जाचे आणि लक्ष्यभेदक असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतीय हवाई दलाने या हल्ल्याचे उपग्रह चित्रांसह पुरावे सादर करत आपली कारवाई पारदर्शक ठेवली आहे.
ही कारवाई भारताच्या लष्करी सामर्थ्याचं आणि सज्जतेचं प्रतिक आहे. पाकिस्तानने घातपाती कारवाया थांबवाव्यात आणि शांततेचा मार्ग स्वीकारावा, अन्यथा भारत अशा प्रकारे ठोस प्रत्युत्तर देत राहील, हे स्पष्ट झालं आहे. “ऑपरेशन सिंदूर” हा केवळ सामरिक विजय नाही, तर भारताच्या धोरणात्मक विचारसरणीचा आणि क्षमतेचा ठसा आहे.