भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थिती दरम्यान एक महत्त्वाची घटना समोर आली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ या कारवाईदरम्यान भारताने पाकिस्तानचं एक लढाऊ विमान पाडल्याची कबुली अखेर पाकिस्तानकडून देण्यात आली आहे. ही कबुली रविवारी उशिरा पाकिस्तानच्या सैन्य प्रवक्त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कबुलीनं दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षात भारताच्या हवाई दलाच्या यशाला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. भारतीय हवाई दलाने ७ मेनंतर सलग तीन रात्रींमध्ये मोठी हवाई कारवाई केली होती. या कारवाईमुळे पाकिस्तानला मोठं नुकसान सहन करावं लागलं. यापैकी एक नुकसान म्हणजे त्यांचं अत्याधुनिक फायटर जेट पाडणं – ज्याची कबुली त्यांनी आता दिली आहे.
पाकिस्तानी सैन्य प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितलं की, भारतासोबतच्या संघर्षात त्यांच्या एका विमानाला थोडं नुकसान झालं आहे. मात्र, त्यांनी त्या विमानाचा तपशील जाहीर केला नाही. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, भारताचा एकही वैमानिक (पायलट) त्यांच्या ताब्यात नाही आणि याबाबतच्या अफवा निराधार आहेत.
भारतीय वायुदलाचे एअर मार्शल एके भारती यांनी याआधीच सूचक माहिती दिली होती. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितलं की, भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोन आणि फायटर जेट लक्ष्य केले होते. “आम्ही किती विमानं पाडली, याची आकडेवारी आमच्याकडे आहे. सध्या मी एवढंच म्हणेन की, ते एक अत्याधुनिक विमान होतं. अशा गोष्टी फार काळ लपून राहत नाहीत,” असं त्यांनी सांगितलं.
डॉग फाइट म्हणजेच हवेत लढाई सुरू असताना एखाद्या विमानाचं “थोडं नुकसान” होणं फारसं शक्य नसतं. मिसाइलने हिट झालं की विमान थेट कोसळतं. त्यामुळे पाकिस्तान जे सांगत आहे, त्यावर तांत्रिकदृष्ट्या विश्वास ठेवणं कठीण आहे. कदाचित पाकिस्तानला पूर्ण सत्य स्वीकारायला तयार नसल्यामुळे त्यांनी ‘थोडं नुकसान’ अशी सावध प्रतिक्रिया दिली असावी.
ही घटना भारताच्या लष्करी क्षमतेचा आणि तत्परतेचा उत्तम नमुना आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत झालेल्या कारवाईत भारताने निर्णायक पाऊल उचलत पाकिस्तानला ठोस उत्तर दिलं आहे. यामुळे भारताची जागतिक पातळीवर सामरिक ताकद अधोरेखित झाली आहे.
पाकिस्तानकडून झालेली ही कबुली हे भारताच्या हवाई दलाच्या क्षमतेचं आणि रणनीतीचं यश मानलं जात आहे. ही केवळ एक लढाई नव्हती, तर देशाच्या सुरक्षेसाठी एक स्पष्ट संदेश होता – भारत कोणतीही कारवाई करण्यास सक्षम आहे आणि वेळ आल्यास ती करताही येते.