वक्फ सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी केंद्र सरकारवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, “भाजपने आता मुस्लिमांचे हित जोपासण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे हिंदूंनी जागं होण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.

भाजपची भूमिका आणि उद्धव ठाकरेंचा सवाल
ठाकरेंनी स्पष्ट केले की, भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात वक्फ बोर्डाच्या जमिनी परत देण्याचा आणि कायद्याचे पालन करण्याचा उल्लेख केला होता. मात्र, आता हा निर्णय नेमका कोणाच्या पावलावर पाऊल ठेवून घेतला जात आहे, हे फडणवीसांनी स्पष्ट करावे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “हे जिनांच्या विचारसरणीचे आहेत की अटलबिहारी वाजपेयी यांच्या?” असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
“वक्फमध्ये बदल करा, पण मग मंदिरांवरही येणार का?”
उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या निर्णयांवर टीका करत सांगितले की, “जर तुम्ही वक्फ बोर्डात सुधारणा करत असाल, तर उद्या तुम्ही हिंदूंच्या मंदिरांवरही हस्तक्षेप करणार का? भाजपने स्वतःला हिंदूंचे रक्षक म्हणवून घेतले, मग आता मुस्लिमांच्या बाजूने भूमिका घेण्याचा प्रयत्न का केला जात आहे?”
“हिंदूंना काही मिळालं का?”
ठाकरेंनी भाजपच्या धोरणांवर निशाणा साधत विचारले की, “होळी, राम नवमी आणि हनुमान जयंतीला भाजपने हिंदूंना काही दिलं का? होळीला पुरणपोळी वाटली का? की फक्त गरज असेल तेव्हाच लोकांना गोंजारायचं?”
“हिंदू मतदार जागा झाला, भाजपला फटका बसेल”
उद्धव ठाकरे यांनी विश्वास व्यक्त केला की, येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठा धक्का बसू शकतो. “भाजपने वक्फ बोर्डाचा मुद्दा घेतल्याने त्यांचं खरं रूप समोर आलं आहे. हिंदू समाजाला आता हे समजलं आहे की, भाजपने त्यांचा केवळ मतांसाठी वापर केला. त्यामुळे हिंदू जागा झाला असून, कुठेही निवडणूक झाली तरी भाजपला मोठा धक्का बसेल,” असा इशारा त्यांनी दिला.
“भाजपने स्वतःच आपली भूमिका स्पष्ट केली”
ठाकरेंनी भाजपला टोला लगावत म्हटले की, “भाजपने वक्फ बोर्डाचा मुद्दा पुढे आणल्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत, कारण त्यामुळे त्यांचे खरे स्वरूप उघड झाले आहे. आता भाजपला स्पष्ट करावे लागेल की, ते मुस्लिमांच्या बाजूने आहेत की हिंदूंच्या?”