शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा निश्चित झाला असून, आगामी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी ते 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी राजधानीत दाखल होणार आहेत. 7 ऑगस्ट रोजी होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत उद्धव ठाकरे सहभागी होणार असून, यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना गती मिळाली असून, पक्षीय रणनीती आखली जात आहे. याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील नेत्यांची ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे, कारण मागील काही महिन्यांपासून आघाडीची कोणतीही बैठक पार पडलेली नव्हती.
उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा केवळ बैठकीपुरता मर्यादित नसून, सध्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत असलेल्या शिवसेनेच्या खासदारांशीही ते स्वतंत्रपणे संवाद साधणार आहेत. बैठकीत देशातील आगामी निवडणुकांसाठी संयुक्त रणनीती, मतदार यादीतील त्रुटी, बिहार विधानसभा निवडणूक, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत भूमिका यावर सखोल चर्चा होणार आहे.
बैठकीसाठी महाराष्ट्रातून शिवसेनेचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार व सुप्रिया सुळे हे उपस्थित राहणार आहेत. इतर राज्यांतील प्रमुख नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आले असून, संसदेचे सत्र सुरू असल्यामुळे अनेक नेते दिल्लीत उपस्थित असतील, असे समजते.
विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंना वैयक्तिकरित्या फोन करून बैठकीचे व स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले आहे. ही राजकीय बैठक आणि अनौपचारिक स्नेहभोजन एकत्र होणे, आगामी निवडणुकांपूर्वी आघाडीच्या एकजुटीचा प्रयत्न असल्याचे जाणकारांचे मत आहे.