रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन सोहळ्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी काही महत्वाच्या मागण्या मांडल्या. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती.

उदयनराजेंनी स्पष्टपणे सांगितलं की, “शिवाजी महाराजांनी समानतेचा विचार रुजवला. सर्व धर्मांना समान मानलं आणि स्वराज्य स्थापन करत लोकांचा सहभाग राज्यकारभारात असावा, हा संदेश दिला. आज आपण जी लोकशाही अनुभवतो, ती महाराजांच्या विचारसरणीवर आधारित आहे.”
महत्वाच्या मागण्या काय?
उदयनराजेंनी केंद्र आणि राज्य सरकारकडे काही ठळक मागण्या केल्या:
- छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जिजामाता यांच्या अपमानाला रोखण्यासाठी कठोर कायदा करावा. अशा प्रकरणात गुन्हा अजामीनपात्र असावा, आणि किमान १० वर्षे जामीन मिळू नये.
- ऐतिहासिक चित्रपट आणि साहित्य निर्मितीसाठी सेन्सॉर बोर्ड स्थापन करावा, जेणेकरून चुकीची माहिती प्रसारित होणार नाही.
- शिवस्वराज्य सर्किटची निर्मिती करावी, जसे रामायण व बुद्ध सर्किट तयार करण्यात आले.
- दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे ही जनतेची मागणी असून ते पूर्ण व्हावे.
- कर्नाटकमधील दावणगिरी जिल्ह्यातील शाहाजी महाराजांच्या समाधीसाठी केंद्र व राज्य सरकारने आवश्यक निधी द्यावा.
शिंदे आणि शाह यांची प्रतिक्रियाही ठळक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराजांच्या कार्याचा गौरव करत सांगितलं की, “शिवाजी महाराज हे लोकांचे खरे राजा होते. अन्याय करणाऱ्यांना त्यांनी तत्काळ शिक्षा दिली. जर त्यांना आणखी २०-३० वर्षे आयुष्य लाभलं असतं, तर संपूर्ण इतिहासच वेगळा झाला असता.”
गृहमंत्री अमित शाह यांचंही गौरव करत शिंदे म्हणाले, “अमित शाह यांनी ३७० कलम हटवून देशातील एकता बळकट केली. त्यांनी देशविघातक शक्तींना थोपवून धरलं आहे.”
भावी पिढीसाठी स्मारकाची गरज
उदयनराजेंनी सांगितलं की, “अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याच्या कामास काही अडथळे आले असतील, पण सध्याच्या राज्यपाल बंगल्याजवळील ४८ एकर जागेवर ते स्मारक उभं राहावं. या स्मारकामुळे भावी पिढीला शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा मिळेल आणि राष्ट्राच्या प्रगतीस हातभार लागेल.”