खासदार उदयनराजे भोसले यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. स्त्री शिक्षणाची सुरुवात ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी केली असा सर्वसामान्यतः इतिहासात उल्लेख असताना, उदयनराजे यांनी वेगळा दावा करत थोरले प्रतापसिंह महाराज हेच पहिले स्त्री शिक्षण प्रवर्तक होते, असं ठामपणे सांगितलं.

पुण्यातील महात्मा फुले वाड्यात आयोजित कार्यक्रमात बोलताना उदयनराजे म्हणाले की, “साताऱ्याच्या राजवाड्यात प्रतापसिंह महाराजांनी स्त्रियांसाठी शाळा सुरू केली होती. फुलेंनी नंतर त्यांचा आदर्श घेतला.” यासोबतच त्यांनी हेही नमूद केलं की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण देखील ह्याच राजवाड्यात झालं होतं.
उदयनराजेंनी पुढे म्हटलं की, “आपल्याला युगपुरुषांच्या कार्याची जपणूक करणं गरजेचं आहे, कारण त्यांचं विचारधन पुढच्या पिढीला प्रेरणा देतं. या स्मारकांचा सन्मान आणि संवर्धन केलं गेलं पाहिजे.”
त्यांच्या या विधानामुळे इतिहास अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. कारण भारतातील स्त्री शिक्षणाच्या प्रवाहात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे हा नवा दावा चर्चेचा आणि वादाचा विषय ठरू शकतो.