महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची क्रांती घडवली, हे आजवरचे इतिहासकारांचे एकमत. मात्र, खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकताच दिलेला एक नवा इतिहासाचा दृष्टिकोन चर्चेचा विषय ठरत आहे. फुले वाड्यावर आयोजित कार्यक्रमात बोलताना उदयनराजेंनी महात्मा फुलेंऐवजी थोरले प्रतापसिंह महाराज हे स्त्री शिक्षणाचे खरे आद्य प्रवर्तक असल्याचा दावा केला.

उदयनराजेंचा दावा काय?
“स्त्री शिक्षणाची खरी सुरुवात प्रतापसिंह महाराजांनी त्यांच्या राजवाड्यात केली होती. आणि याच ठिकाणी पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं होतं,” असं भोसले यांनी स्पष्ट केलं. महात्मा फुलेंनी प्रतापसिंह महाराजांचं अनुकरण केल्याचीही टिप्पणी त्यांनी यावेळी केली.
मंगेश ससाणे यांची प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी यावर कडक प्रतिक्रिया दिली. “फुले वाड्यावर जयंतीच्या दिवशी फुलेंच्या योगदानाचं अवमूल्यन करून आपल्या पूर्वजांचं महत्त्व अधोरेखित करणं दुर्दैवी आहे,” असं ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “महात्मा फुले यांनी मुलींसाठी 1 जानेवारी 1848 साली पहिली शाळा सुरू केली, हा इतिहास नाकारता येणार नाही.”
“शाळेतील विद्यार्थिनी कोण होत्या?” — ससाणेंचे प्रश्न
“जर प्रतापसिंह महाराजांनी खरोखर पहिली शाळा सुरू केली होती, तर त्या शाळेत शिकणाऱ्या मुली कोण होत्या? त्यांचे पुढे काय झाले? आणि ही शाळा पुढे सुरू राहिली का?” असे प्रश्न मंगेश ससाणे यांनी उपस्थित केले.