राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी रायगड किल्ल्यावर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या शिल्पावर थेट आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांनी हे शिल्प अस्सल ऐतिहासिक नाही, असं नमूद करत त्याच्या हटवण्याची मागणी केली आहे. “ते कुत्रं भारतातलं दिसतच नाही. लांब कानाचं, ब्रिटिशांसारखं दिसणारं हे प्राणी आपल्या संस्कृतीशी जुळत नाही. मग त्याचं इतकं महत्त्व का द्यावं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शिवस्मारकाबाबत नवी सुचवण
मुंबईतील अरबी समुद्रात प्रस्तावित असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अद्याप रखडलेलं असताना, उदयनराजेंनी पर्यायी जागेचा प्रस्ताव मांडला. “जर पर्यावरण कारणास्तव समुद्रातील स्मारक अशक्य असेल, तर गव्हर्नर हाऊसची 48 एकर जागा वापरावी. राज्यपालाला इतकी मोठी जागा खरंच आवश्यक आहे का?” असा प्रश्न उपस्थित करत, त्यांनी लवकरच यासंदर्भात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं.
‘फुले’ चित्रपटावरील वादावर मत
महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित आगामी चित्रपटावर वाद निर्माण झाल्यानंतर, उदयनराजेंनी सेन्सॉर बोर्डावर प्रश्न उपस्थित केले. “राजे, फुले किंवा इतर थोर नेत्यांवरील चित्रपटांची मांडणी करताना इतिहासाचा आदर राखला पाहिजे. यासाठी इतिहासतज्ज्ञांचं स्वतंत्र सेन्सॉर मंडळ असावं,” अशी त्यांची भूमिका होती. ‘छावा’ चित्रपटाच्या वादावरही त्यांनी याचप्रकारे मत व्यक्त केलं.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेला उपचार नाकारल्याचा आरोप झाल्यानंतर उदयनराजेंनी अशा चॅरिटेबल हॉस्पिटल्सच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. “ही सरकारी जागा आहे आणि ती मोफत दिली जाते, मग गरजू रुग्णांवर मोफत उपचार व्हायला हवेत. पण तसं खरंच होतंय का? यावर सरकारी तपास हवा,” अशी ठाम मागणी त्यांनी केली.