इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना मिळालेल्या धमकीच्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. नागपूरमधील प्रशांत कोरटकर यांनीच सावंत यांना धमकी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या तपासात कोरटकरच्या मोबाईल सीडीआर (Call Detail Record) च्या आधारे हा निष्कर्ष निघाला आहे.

धमकीचा उगम नागपुरातूनच
काही दिवसांपूर्वी इंद्रजीत सावंत यांनी जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा दावा केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी प्रशांत कोरटकरच्या कॉल रेकॉर्डची तपासणी केली आणि धमकी त्याच्याच नंबरवरून देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. नागपूर येथूनच ही धमकी देण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोरटकरने फेटाळले आरोप, पण सत्य समोर!
प्रशांत कोरटकरने सुरुवातीला आवाज मार्फ करण्यात आल्याचा दावा करत आपल्यावरील आरोप फेटाळले होते. मात्र, पोलिस तपासात त्याचा हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले. आता कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांनी कोरटकरचा शोध सुरू केला आहे. कोल्हापुरात आधीच त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि आता नागपूरमध्येही त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून, प्रशांत कोरटकरला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.