मुंबईत इंदू मिल परिसरात उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामाची गती अपेक्षेप्रमाणे नसल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. या स्मारकात बाबासाहेबांचा 450 फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे आणि सध्या हे काम 60 ते 70 टक्क्यांपर्यंतच पूर्ण झालं आहे.

या स्मारकाची पायाभरणी सप्टेंबर 2020 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाली होती. नुकताच या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी MMRDA चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी भेट दिली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मारकाच्या बांधकामात अद्याप मोठा टप्पा बाकी आहे.
यासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “या स्मारकाच्या कामाचा मी अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. शरद पवार साहेबांनी देखील यासाठी सातत्याने प्रयत्न केले. मात्र आता या कामास तीन ते चार वर्षांचा कालावधी झाला असून, अद्यापही अपेक्षित वेगाने काम पूर्ण झालेलं नाही, हे दुर्दैवी आहे. सरकारने या प्रकल्पाला प्राधान्य द्यावं आणि उत्कृष्ट दर्जाचं काम तातडीने पूर्ण करावं, अशी माझी विनंती आहे.”
स्मारकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये:
भव्य पुतळा: बाबासाहेबांचा एकूण 106 मीटर (सुमारे 350 फूट) उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यात 30 मीटरचा चौथरा आणि त्यावर 76.68 मीटरचा पुतळा समाविष्ट आहे.
बौद्ध स्थापत्यशैलीचा समावेश: स्मारकात बौद्ध घुमट, स्तूप आणि ध्यानकेंद्र यांचा समावेश असेल.
प्रेक्षागृह व सांस्कृतिक उपक्रम: एक आधुनिक प्रेक्षागृह तयार करण्यात येणार आहे, ज्यात सुमारे 1000 लोकांची बसण्याची क्षमता असेल.
संशोधन व ग्रंथालय: बाबासाहेबांच्या विचारसरणीवर आधारित संशोधन केंद्र व मोठं ग्रंथालय उभारण्यात येणार आहे, ज्यात त्यांच्या लिखाणाचा व समाजकार्याचा अभ्यास करता येईल.
ध्यानधारणा केंद्र: विपश्यना साधनेसाठी खास केंद्र उभारण्यात येणार आहे.
पर्यटन व प्रदर्शन क्षेत्र: स्मारकात एक विशेष प्रदर्शन दालन आणि चौथऱ्याच्या सभोवताली फेरफटका मारण्यासाठी गोलाकार मार्ग तयार केला जाणार आहे.
हे स्मारक केवळ आंबेडकर अनुयायांसाठी नव्हे तर देशभरातून येणाऱ्या लोकांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे. मात्र यासाठी त्याचे काम वेळेत आणि गुणवत्ता कायम राखून पूर्ण होणे आवश्यक आहे.