धुळे जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या तब्बल 1 कोटी 84 लाख रुपयांच्या रोख रकमेने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी थेट आरोप करत शिंदे गटाला आणि आमदार अर्जून खोतकर यांना लक्ष केले आहे.

संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार, ही रक्कम महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीच्या दौऱ्यातील आमदारांना देण्यासाठी जमा केली जात होती. विशेष म्हणजे, ही समिती विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी धुळ्यात गेली होती. मात्र त्या दौर्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
राऊत म्हणाले की, अंदाज समितीचे प्रमुख अर्जून खोतकर यांनी धुळे जिल्ह्यातील ठेकेदारांना धमकावले होते की, जर दिलेल्या कामांत त्रुटी आढळल्या, तर त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येईल. त्यानंतरच ठेकेदारांकडून 15 कोटी रुपयांची रक्कम एकत्र करण्याचे काम सुरू झाले. यापैकी 5 कोटी रुपये आधीच जमा झाले होते आणि उर्वरित 10 कोटी रुपये लवकरच पोहोचवले जाणार होते, असेही राऊत यांनी सांगितले.
या सगळ्या घडामोडींनंतर संजय राऊत यांनी असा दावा केला की, अर्जून खोतकर यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “हा प्रकार पाहता हे प्रकरण केवळ राज्य स्तरावर न ठेवता ते ईडी (अंमलबजावणी संचालनालय) आणि सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभाग) यांच्याकडे दिले पाहिजे, कारण ही भ्रष्टाचाराची मोठी साखळी आहे.”
राऊत यांनी माजी आमदार अनिल गोटे यांचं विशेष कौतुक केलं. त्यांनी सांगितलं की, गोटे आणि स्थानिक शिवसैनिकांच्या दबावामुळेच हे प्रकरण उघडकीस आलं. त्यांनी असा सवालही उपस्थित केला की, अंदाज समितीचे प्रमुख खोतकर आता कुठे आहेत? ते फरार झाले आहेत का? कारण पैसे सापडल्यानंतर काही संबंधित लोक अदृश्य झाले आहेत.
राऊत यांच्या मते, हे प्रकरण केवळ एका ठिकाणी घडलेलं नसून, मागील वर्षभरात किंवा त्याही आधी अडीच वर्षांत या समितीच्या दौऱ्यांमध्ये काय-काय झालं, त्याचाही सखोल तपास होणे आवश्यक आहे. अन्यथा, या प्रकारांचा गैरवापर करून सरकारी यंत्रणांवर आणि निधीवर डल्ला घालण्याचा प्रकार पुन्हा-पुन्हा घडू शकतो.
संजय राऊत यांचे हे वक्तव्य सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. सरकारकडून आणि यंत्रणांकडून या आरोपांची चौकशी होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.