राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) मध्ये शाब्दिक चकमकी वाढल्या असून, मनसे देखील या समीकरणात येण्याच्या हालचालीत आहे. अशा घडीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंच्या युतीच्या चर्चांना उत्तर देत भाजप महायुतीने 51 टक्के मतदानाची तयारी केल्याचं ठामपणे सांगितलं आहे.

“आम्ही विधानसभेत देखील 51.78 टक्के मतं मिळवली होती. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आमची महायुती पूर्णपणे तयार आहे. कोणतीही युती झाली, कोणीही समोर आलं तरी आमचा विजय नक्की आहे,” असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देश आणि महाराष्ट्र विकासाच्या दिशेने चालला असून, जनता हीच विकासाची साथ देणार आहे.
शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चांवर बोलताना त्यांनी टोला लगावत सांगितलं की, “ज्यांना निवडणूक लढवण्याची तयारी नाही, ते अशा प्रकारची विधानं करतात. आम्ही उद्याच निवडणुका लागल्या तरी लढायला सज्ज आहोत.” महाराष्ट्रात भाजपचे 1 कोटी 51 लाख सदस्य असून, शिंदे आणि अजित पवारांसह भाजपची महायुती शक्तिशाली असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.
दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आदेश दिले. तसेच, शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांनी परस्परातील वाद मिटवण्याचा सल्ला दिला. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “राज ठाकरे यांनी पक्ष हिमतीवर उभा केला आहे. काही पदाधिकाऱ्यांना भडकवलं जातंय, म्हणूनच त्यांनी हेवेदावे विसरण्याचा सल्ला दिला असेल.”
मुंबई महापालिकेचा ताबा राखण्यासाठी सर्वच पक्षांची रणनिती स्पष्ट होऊ लागली आहे. येणाऱ्या काळात ही राजकीय समीकरणं आणखी रोचक वळण घेण्याची शक्यता आहे.