शिवसेना (ठाकरे गट) नेते व आमदार भास्कर जाधव एका मेळाव्यादरम्यान पुन्हा एकदा भावनिक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. कोकणातील वेळणेश्वर येथे झालेल्या मेळाव्यात त्यांचा मुलगा विक्रांत जाधव भाषण करत असताना, “आपल्यासोबत घात नाही, विश्वासघात झालाय,” असे शब्द ऐकून भास्कर जाधव भावनाविवश झाले आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सतत पक्षांतराची चर्चा रंगत असून, ठाकरे गटालाही याचा मोठा फटका बसताना दिसतो आहे. नुकतेच नाशिक आणि कोकणातील काही महत्त्वाचे पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाले. यामुळे ठाकरे गटातील अस्वस्थता अधिकच वाढली आहे. अशाच पार्श्वभूमीवर वेळणेश्वर येथे आयोजित मेळाव्यात जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर आणि सदस्य नेत्रा ठाकूर यांनी शिवसेना सोडल्यामुळे नाराजीचे सूर उमटले.
विक्रांत जाधव यांनी भाषणात आपली नाराजी स्पष्ट करताच, भास्कर जाधव भावूक झाले. त्यांनी डोळे पुसताना दिसल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं. याआधीही भास्कर जाधव अश्रू अनावर करताना पाहिले गेले असून, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याच्याही चर्चा झाल्या होत्या. त्यामुळे त्यांचं संभाव्य पक्षांतर यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
फक्त राजकारणच नव्हे, तर भास्कर जाधव यांचे भावनिक स्वरूप त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही दिसून येते. त्यांच्या घरी घरकाम करणारी सुप्रिया हिचं मे महिन्यात लग्न होतं. या खास प्रसंगी जाधव कुटुंबीयांनी आपली सगळी कामं थांबवून लग्नाला उपस्थिती लावली. लग्नानंतर सुप्रिया जेव्हा निरोप घेण्यासाठी समोर आली, तेव्हा तिने जाधव कुटुंबियांना मिठी मारताच, उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत अश्रू आले. खुद्द भास्कर जाधव यांचाही कंठ दाटून आला आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
या साऱ्या घडामोडी जाधव यांच्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाची आणि राजकीय विश्वासघातामुळे त्यांच्या मनात दाटलेल्या भावना व्यक्त करतात.