अहिल्यानगरच्या कर्जत नगरपंचायतीत नुकत्याच घडलेल्या राजकीय नाट्यात मोठे उलथापालथीचे चित्र पाहायला मिळाले आहे. नगराध्यक्ष उषा राऊत यांनी अविश्वास ठरावापूर्वीच पदाचा राजीनामा दिल्याने भाजप नेते राम शिंदे यांच्यासाठी नगरपंचायतीवर ताबा मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.

कर्जत नगरपंचायतीमध्ये एकूण 17 नगरसेवक आहेत. 2022 मधील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 12, काँग्रेसने 3 आणि भाजपने केवळ 2 नगरसेवक निवडून आणले होते. यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडीच्या माध्यमातून नगरपंचायतीवर वर्चस्व मिळवले. मात्र तीन वर्षांनंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
गेल्या काही आठवड्यांपासून भाजपने आपले राजकीय डावपेच खेळायला सुरुवात केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12 पैकी 8 नगरसेवक आणि काँग्रेसचे सर्व 3 नगरसेवक भाजपाच्या गटात सामील झाले. परिणामी, भाजपकडे आता एकूण 13 नगरसेवकांचे बहुमत तयार झाले. या घडामोडींनी रोहित पवार यांची राजकीय पकड कमकुवत झाली आहे.
7 एप्रिल रोजी भाजपसमर्थक नगरसेवकांनी नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. याच दरम्यान, राज्य सरकारने नगराध्यक्ष हटविण्यासाठी नगरसेवकांना अधिकृत अधिकार देणारा अध्यादेश जारी केला. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विशेष सभा घेण्याचे ठरले होते. मात्र, सभेला सुरुवात होण्यापूर्वीच नगराध्यक्ष उषा राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. राजीनाम्याचे कारण त्यांनी वैयक्तिक असे नमूद केले, तरी माध्यमांशी बोलताना त्यांनी राम शिंदे यांच्यावर पैसे आणि सत्तेचा वापर करून नगरसेवकांना दबावाखाली आणल्याचा गंभीर आरोप केला.
भाजपने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. भाजप स्थानिक नेत्यांनी असा दावा केला आहे की, आमच्याकडे सर्व पुरावे आहेत आणि गरज भासल्यास ते उघड केले जातील. दुसरीकडे, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे की, नगराध्यक्षपदाचे अडीच वर्षांचे करारनंतरही उषा राऊत यांनी स्वतःहून राजीनामा दिला नसल्याने त्यांनी भूमिका बदलली आणि भाजपच्या गटात सहभागी झाले.
2022 मध्ये रोहित पवार यांनी कर्जत नगरपंचायत आपल्या प्रभावाखाली आणण्यासाठी मोठ्या राजकीय खेळी केल्या होत्या. भाजपमधील नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी देत सत्ता मिळवली होती. मात्र आता, काही वर्षांतच परिस्थिती उलटून भाजपने पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे रोहित पवार यांना हा मोठा धक्का बसल्याची चर्चा संपूर्ण अहिल्यानगर आणि कर्जत परिसरात जोरात सुरू आहे.