सध्या महाराष्ट्राच्या दौर्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. ही चर्चा सह्याद्री अतिथीगृहात जवळपास तासभर सुरू होती. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील वित्तीय वाटप, शासन निर्णयांची अंमलबजावणी आणि महायुतीतील समन्वय या मुद्द्यांवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली.

गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमध्ये नाराजीचे सूर उमटत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही निधीच्या कमतरतेकडे लक्ष वेधले होते. याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी शाह यांची भेट घेत, काही अडचणी थेट मांडल्या.
या बैठकीत अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना दिलासा देणारे आश्वासन दिले. “महायुतीच्या यशासाठी तुम्ही जे योगदान दिले आहे, त्याकडे दुर्लक्ष होणार नाही. राज्यात लवकरच सकारात्मक बदल दिसतील,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, शिंदे गटासाठी ही बैठक मोठा आधार ठरू शकते.
एकनाथ शिंदेंचा अमित शाह यांच्यावर विश्वास:
शिंदे यांनीही शाह यांची स्तुती करताना, कलम 370 हटवण्याचा निर्णय, देशातील सुरक्षा व्यवस्था आणि दहशतवादाविरोधातील कारवाई याबाबत त्यांचं नेतृत्व प्रशंसनीय असल्याचं म्हटलं. “सीमेवर शांतता नांदते ती त्यांच्या ठाम निर्णयांमुळेच,” असंही त्यांनी नमूद केलं.