राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते अतुल सावे यांनी थेट शिवसेनेच्या आमदाराला इशारा दिला आहे. आमच्याकडे 237 आमदार आहेत, त्यामुळे युतीमध्ये राहायचं नसेल तर ते बाहेर पडावं, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला सुरुवात होण्याची चिन्हं आहेत.

हदगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम यांनी तांडावस्ती सुधार योजनेच्या निधी वाटपाबाबत नाराजी व्यक्त करत अतुल सावे यांना पत्र लिहिलं होतं. पत्रात त्यांनी आरोप केला होता की, सरकारने तांडावस्ती योजनेचा निधी विरोधकांकडे वळवला आहे. तसेच, नांदेडमध्ये येताच याचा निषेध केला जाईल, असा इशाराही बाबुराव कदम यांनी दिला होता.
या पार्श्वभूमीवर नांदेड दौऱ्यावर असताना अतुल सावे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी स्पष्ट केलं की, निधी वाटपाच्या बाबतीत आमच्याकडे कोणताही पक्षपात होत नाही. सर्व प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजूर होऊन येतात आणि आम्ही त्यांना मंजुरी देतो. त्यामुळे आमदारांनी त्यांच्या भागातील प्रस्ताव तपासून पाहावेत, अशी सूचनाही त्यांनी दिली.
अतुल सावे यांनी पुढे स्पष्ट केलं की, पाच वर्षांपर्यंत आमच्याकडे 237 आमदार आहेत. त्यामुळे युतीत राहायला आवडत नसेल तर ज्यांना वाटतं ते बाहेर पडावं. त्यांनी दिलेला हा थेट इशारा शिवसेनेच्या बाबुराव कदम यांच्यासह अन्य नाराज आमदारांसाठी एक संदेश मानला जात आहे.
तांडा वस्ती योजना निधीबाबत बोलताना सावे म्हणाले की, या योजनेसाठी प्रस्ताव कलेक्टर तयार करतात. आमचं काम केवळ मंजुरीचं आहे. त्यामुळे निधी मिळाला नाही, असं म्हणणं चुकीचं आहे. निधीचे वितरण आमच्या खात्याच्या प्रक्रियेप्रमाणेच होतं आणि कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय पुढे जातं.
यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) बैठकीपूर्वी सावे यांनी नांदेडच्या विविध महत्त्वाच्या विषयांवर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. शहरातील पाणीटंचाई, आरोग्य, शिक्षण आणि पोलीस खात्याशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. लोकप्रतिनिधींनाही सूचना देण्यात आल्या की, त्यांच्या मतदारसंघातील महत्त्वाचे प्रलंबित प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत.
अतुल सावे यांच्या या वक्तव्यामुळे नांदेडच्या राजकारणात चांगलाच गदारोळ निर्माण झाला आहे. पुढे शिवसेनेची भूमिका काय असेल आणि युतीत कोणते बदल होतील, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.