राजकारणात काहीही शक्य असतं, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटफूट आणि त्यानंतरच्या घडामोडींमुळे आता पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का, या चर्चेला उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चांना नवे बळ मिळाले आहे.

शिरसाट म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद हा केवळ कौटुंबिक स्वरूपाचा असून त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार भविष्यात एकत्र येऊ शकतात, हे नाकारता येत नाही. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा नवा विषय तयार झाला आहे. शिरसाट मीडियाशी संवाद साधत होते, त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
शिरसाट यांनी उद्धव ठाकरे गटावरही टीका केली. त्यांनी म्हटलं की, ठाकरे गटाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करून चूक केली. आम्ही आधीपासूनच म्हणत होतो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांचाही ठाकरे गटासोबत फार काळ राहाण्याचा इरादा नाही. सध्या त्या युतीचं भवितव्य अंधारात आहे, असंही ते म्हणाले.
याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरे गटाची ‘ना घर का ना घाट का’ अशी अवस्था झाली असल्याचे सांगितले. गेल्या काही महिन्यांत काँग्रेससोबत यांची कोणतीही ठोस बैठक झाली नाही, संवादही झालेला नाही. त्यामुळे आता ठाकरे गटाला एकट्याने राजकीय प्रवास करावा लागणार आहे, आणि तो त्यांच्यासाठी महागात पडू शकतो, अशी टीकाही त्यांनी केली.
अजित आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्यावरून विचारले असता, शिरसाट यांनी थेट उत्तर न देता असे संकेत दिले की, काहीतरी घडत आहे. त्यांचे एकत्र येणे नवीन नाही, यापूर्वीही असे झाले आहे. यावेळी जर ते एकत्र आले, तर नेतृत्व कोण करेल, आणि युती कोणाशी होईल, हे पाहावे लागेल. मात्र, भाजप आणि शिंदे गटाची युती भक्कम असून त्यात कोणताही संभ्रम नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘लाडकी बहीण’ योजनेवर बोलताना त्यांनी सांगितले की, योजनेमध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेविषयी घेतलेला निर्णय कायम राहील. भविष्यात काही सुधारणा किंवा नवीन बाबी समाविष्ट करायच्या असतील, तर त्याचे स्वागतच आहे.
संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवे समीकरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.