राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणणारी मोठी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकाच वाहनातून प्रवास केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

पुण्यातील सर्किट हाऊस ते कौन्सिल हॉल या मार्गावर अजित पवार, उत्तम जानकर आणि उमेश पाटील यांनी एकत्र प्रवास केला. यावेळी जवळपास दहा मिनिटे त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, ही चर्चा कोणत्या मुद्द्यावर झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या भेटीवर स्पष्टीकरण देताना उमेश पाटील म्हणाले, “उत्तम जानकर यांनी उजनी धरणातून माळशिरस तालुक्यात पंधरा दिवस आधी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. या संदर्भातच अजित पवार यांच्याशी चर्चा करायची होती. मात्र, त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांनी गाडीत चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला.”
विशेष म्हणजे, याआधीही शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता जानकर आणि अजित पवार यांची भेट झाल्याने वेगवेगळ्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. आगामी काळात या भेटीचा राजकीय संदर्भ काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.