महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी हालचाल सुरू असून, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेते अजित पवार यांच्या गटात जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांनंतर अनेक पक्षांमध्ये नेत्यांचे पक्षांतर सुरू झाले होते. महाविकास आघाडीला झालेल्या पराभवानंतर काँग्रेस, ठाकरे गट, आणि शरद पवार गटातील काही महत्त्वाचे नेते बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना (ठाकरे गट) सोडून अनेक नेते शिंदे गट आणि भाजपमध्ये दाखल झाले, तर आता शरद पवार गटातील काही नेतेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सामील होण्याच्या मार्गावर आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल मोटे, राहुल जगताप, आणि विजय भांबळे हे शरद पवार यांची साथ सोडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत हे नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढले होते. आता ते अजित पवार यांच्या गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.
पक्षांतर्गत मतभेद आणि नाराजीचा सूर
अजित पवार गटात या नव्या नेत्यांना प्रवेश द्यावा की नाही, यावर गटांतर्गत मतभेद निर्माण झाले आहेत. विशेषतः, ज्या उमेदवारांनी महायुतीतील पक्षांविरोधात निवडणूक लढवली होती, त्यांना पक्षात सामील करून घेण्यास काहीजण विरोध करत आहेत. यामुळे महायुतीतही नाराजी वाढण्याची शक्यता आहे.
अजित पवार आपल्या गटाचा विस्तार करण्यासाठी शरद पवार गटातील नेत्यांना सोबत घेत असल्याने पुन्हा एकदा दोन गटांमध्ये राजकीय चढाओढ सुरू झाली आहे. आता या घडामोडींवर दोन्ही नेत्यांची भूमिका काय असेल, आणि महायुतीतील इतर पक्ष यावर काय प्रतिक्रिया देतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.