पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांचे कान टोचले आहेत. दौंड येथील कला केंद्रातील आमदाराच्या भावाने केलेल्या गोळीबार प्रकरणावरून त्यांनी नेत्यांचे कान टोचले आहेत. चौफुल्याला तरफडू नका, बदनामी होते, असं पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत भाषण करताना पक्षाच्या नेत्यांसमोर अजित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे यावेळी आमदार शंकर मांडेकर उपस्थित होते. भोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाला चौफुला येथील कला केंद्रात गोळीबार केल्याबद्दल अटक करण्यात आली होती, या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली होती.
कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका
दरम्यान मांडेकर गोळीबार प्रकरणानंतर अजित पवारांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका, असा सल्ला अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. कुठे ही जाऊन ठोय ठोय करू नका, असंही अजित पवार या कार्यक्रमावेळी बोलताना म्हणाले आहेत, या कार्यक्रमाला आमदार शंकर मांडेकर देखील उपस्थित होते, त्यांच्यासमोरच अजित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहात, तुमच्याकडं कधी, कुठे ,काही चूक होऊ देऊ नका, कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका. कुठे जाऊन ठोय ठोय करू नका, अशी तंबी आमदार शंकर मांडेकर यांच्यासमोरच अजित पवारांची कार्यकर्त्यांना दिली आहे.

काही जणांनी कशाप्रकारे आपल्या सुनांना त्रास दिला?
शंकर मांडेकर यांच्या भावावरती चौफुला येथे गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज पुण्यातील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतच्या कार्यक्रमात भाषण करताना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. त्याचबरोबर वैष्णवी हगवणे प्रकरणावर देखील अजित पवारांनी भाष्य केलं आहे. काही जणांनी कशाप्रकारे आपल्या सुनांना त्रास दिला? आम्ही लग्नात गेलो हा आमचा दोष का? आम्ही त्यांना सुनेला त्रास द्यायला सांगितलं का? असं म्हणत अजित पवारांनी शंकर मांडेकर यांच्या भावाने केलेला गोळीबार प्रकरणावर आणि वैष्णवी हगवणे प्रकरणावर भाष्य केलं आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
तुम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी झालेले आहात. काहीजण सहकारी झालेला आहात. त्यामुळे आता तुमच्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका, कुठे चौफुल्याला तरफडू नका, तिथे जाऊन ठोय ठोय करू नका, ढगात गोळी मारू नका. यामुळे त्याची पण बदनामी होईल आणि तो ज्या पक्षाचा आहे त्याची पण होईल. हे चालणार नाही. काहींनी कशा प्रकारचा त्रास सुनेला दिला. आम्ही सांगितल का? त्यांनी फक्त लग्नाला बोलावलं, उद्या सरपंचाच्या घरी लग्न असेल बोलावलं तर आम्ही जाणार आम्हाला काय माहिती पुढं काय दिवा लागणार आहे, आम्हाला माहिती असतं तर आम्ही नाही जाणार, लक्षात ठेवा. आपापसात सलोखा ठेवा, असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे, दरम्यान अजित पवारांनी यावेळी केलेल्या हाताच्या अॅक्शन नंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.