आज दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार होते, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही विशेष उपस्थिती होती.

शरद पवारांनी मोदींचं कौतुक केलं
उद्घाटन सोहळ्यात बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष कौतुक केले. त्यांनी म्हटलं,
“मराठी मानसाने अटकेपार झेंडा फडकवला आहे. मराठी संमेलन देशाच्या राजधानीत होणं हा अभिमानाचा विषय आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी मोदींनी घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे.”
यासोबतच पवारांनी इतिहासाचाही उल्लेख करत सांगितलं की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं होतं आणि तब्बल ७० वर्षांनंतर दिल्लीमध्ये पुन्हा हा सोहळा होत आहे.
राजकारण आणि साहित्य यांचं घट्ट नातं
शरद पवार यांनी साहित्य आणि राजकारणाच्या संबंधावरही भाष्य करताना सांगितलं की,
“राजकारण आणि साहित्य यांचं नातं फार जवळचं आहे. सध्याच्या परिस्थितीत संवाद कठीण होत चालला आहे, त्यामुळे साहित्यिकांवर मोठी जबाबदारी आहे.”
तसेच त्यांनी तारा भवाळकर यांना संमेलनाचं अध्यक्षपद मिळाल्याचा आनंदही व्यक्त केला आणि महाराष्ट्र व दिल्लीतील राजकीय-सांस्कृतिक संबंधांवर भाष्य केलं.
मोदींना निमंत्रण दिल्यावर त्वरित होकार
शरद पवारांनी स्पष्ट केलं की, नरेंद्र मोदींना संमेलनासाठी निमंत्रण दिल्यानंतर त्यांनी लगेचच होकार दिला आणि संमेलनाला हजेरी लावली, यासाठी त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
या संमेलनाच्या निमित्ताने साहित्य आणि राजकारणाचा मिलाफ पुन्हा एकदा समोर आला असून, मराठी संस्कृतीचा सन्मान दिल्लीच्या भूमीवरही कायम असल्याचं दिसून आलं.