2016 मध्ये माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर कथित आरोप केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या अडचणी वाढल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध बॉन्ड वॉरंट (BW Warrant) जारी केला आहे. दमानिया यांना 23 सप्टेंबर 2025 रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ही कारवाई तब्बल 9 वर्षांपूर्वीच्या प्रकरणावरून करण्यात आली आहे. 2016 मध्ये पत्रकार परिषद व टीव्ही मुलाखतींमधून दमानिया यांनी खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. यामुळे खडसे यांच्यासह भाजपची प्रतिमा मलिन झाली, असा दावा तक्रारदार डॉ. मनोज महाजन यांनी केला होता. त्यावरून भारतीय दंड विधान कलम 499 व 500 अंतर्गत मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणात शिरपूर पोलिसांनी तपास करून भाजपा नेत्यांचे जबाब घेतले आणि अहवाल न्यायालयात सादर केला. मात्र, आज झालेल्या सुनावणीला अंजली दमानिया हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे न्यायालयाने बीडब्ल्यू वॉरंट जारी करत पुढील सुनावणीची तारीख 23 सप्टेंबर निश्चित केली आहे.
दमानिया यांचा हा वाद पहिल्यांदाच चर्चेत आलेला नाही. त्यांनी यापूर्वीही धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली होती. त्याचवेळी त्यांनी खडसेंविरोधात सुरू असलेल्या संघर्षाचा पुनरुच्चार केला होता.
“मी कोणाच्याही दबावाला बळी न पडता सत्यासाठी लढते,” असं त्यांनी अनेकदा म्हटलं आहे. मात्र आता न्यायालयीन प्रक्रियेमुळे त्यांच्यासाठी ही मोठी अडचण ठरू शकते.